पुणे : विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सातबा वाघ यांचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागातील फुरसुंगी फाटा येथे सोमवारी सकाळी घडली. अपहरण करणाऱ्या आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके आहेत.
सतीश सातबा वाघ (वय ५८, रा. फुरसुंगी, सासवड-पुणे रस्ता, हडपसर) हे सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घरातून फिरायला बाहेर पडले. त्यावेळी मोटारीतून आलेल्या चार ते पाच जणांनी वाघ यांना धमकाविले. वाघ यांना धमकावून मोटारीत बसवून अपहरणकर्ते सासवड रस्त्याने पसार झाले. त्यावेळी तेथून निघालेल्या एकाने ही घटना पाहिली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.
वाघ यांचे अपहरण का झाले, तसेच त्यांचे कोणाशी आर्थिक व्यवहार किंवा वैमनस्य होते का ? यादृष्टीने तपास सुरू आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे. पसार झालेल्या चोरट्यांच्या मागावर पोलिसांची पथके आहेत.