अशातच भाजपाचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. किरीट सोमय्या यांची पक्षाकडून विधानसभेच्या निवडणूक संपर्कप्रमुखपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. पण किरीट सोमय्या यांनी हे पद नाकारलं.
यानंतर आता किरीट सोमय्या यांनी ट्विव्ही ९ मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “साडेपाच वर्ष कुठलही पद न घेता मी सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाचं काम करत आहे”, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
गेली साडेपाच वर्ष कोणतंही पद माझ्याकडे नाही. भारतीय जनता पक्षातील सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे. १८ फेब्रुवारी २०१९ मध्ये उद्धव ठाकरे अमित शाह यांच्याबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत यायला तयार नव्हते. तेव्हा पत्रकार परिषदेमधून देवेंद्र फडणवीस यांनी मला निघून जायला सांगितलं. तेव्हापासून आजपर्यंत मी जीव लावून काम केलेलं आहे. मला कुठल्याही पदाची गरज नाही. आता हे त्यांनाही पटलं. आम्ही काम जोराने करत आहोत. नाराजी वैगेरे नाही. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल”, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.