अहमदनगर -कीर्तनकार अजय महाराज बावस्कर यांची आलीशान कार पंढरपूरमध्ये जळाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बारस्कर महाराजांची कार कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. मागील काही दिवसांपूर्वी बावस्कर महाराज यांनी मनोज जरांगेंवर टीका केली होती, त्यानंतर ते जास्तच चर्चेत आले आहेत.
अजय महाराज बारस्कर आषाढी वारीसाठी १६ तारखेला पंढरपुरात आले होते. काल एकादशीच्या निमिताने ते पंढरपूरातच होते. त्यांनी पंढरपूर येथील ६५ एकरच्या पार्किंगमध्ये गाडी लावलेली होती. त्यानंतर ते गाडी परत घेण्यास गेले असता त्यांची गाडी जळाल्याचं निदर्शनास आलं. गाडीचा जळून कोळसा झालाय. कोणताही अवशेष शिल्लक नसल्याचं दिसत आहे.
परवा मध्यरात्री ते काल दुपारच्या दरम्यान गाडी अज्ञाताने जाळल्याचा प्रकार समोर आलाय. भटुंबरे गावातील पंडीत शेंबडे यांच्या शेतात पार्क केलेली अजय बावस्कर यांची गाडी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यानंतर अजय महाराज बावस्कर यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलीय. पोलीस गाडी कोणी जाळली याचा शोध घेत आहेत.