शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा यासाठी खिचडी, घुगऱ्या, दूध, अंडी असे पदार्थ दिले जातात. मात्र यावरून आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या मध्यान भोजनात विद्यार्थ्यांना अंडी वितरित करण्याच्या निर्णयाला भाजप जैन सेलने तीव्र विरोध केला आहे. भाजप जैन सेलकडून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विरोध करत कडधान्याची पाकीटे पाठवण्यात आलीत. कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशन पोस्ट ऑफिसमधून मंत्री केसरकर यांना ही कडधान्याची पाकीटे पाठवली गेली आहेत. मध्यान भोजनात (मधल्या सुट्टीत) विद्यार्थ्यांना अंडे वितरित करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा, अशी मागणी भाजपा जैन सेल प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी केलीये. निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातून दीपक केसरकर यांना मोठ्या संख्येनं कडधान्याची पाकीट पाठवणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरड धान्यावरती विशेष भर देण्याचा निर्णय घेतला आहे. याला मंत्री दीपक केसरकर घाबरतात का? असा सवाल देखील आवेळी भाजपा जैन सेल प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी उपस्थित केला आहे.