कोल्हापुरमधील एक नवरी लग्नानंतर लगेच पळून गेल्याची घटना समोर आलीय. हनिमुनला गेल्यानंतर या नवरीने धूम ठोकल्याचं समोर आलंय.याबाबत सविस्तर वृत्त असं की, कोल्हापूरच्या एका तरूणाने मध्यस्थ्याद्वारे लग्न ठरवलं होतं. त्याने लग्न ठरविण्यासाठी मध्यस्थाला दीड लाख रूपये दिले होते, तर नवरीच्या आईला लग्नाच्या खर्चासाठी पन्नास हजार रूपये दिले होते. यांचा मंदिरात साखरपुडा झाला होता. तर नवरीच्या घरी अगदी धुमधडाक्यात विवाहसोहळा पार पडला होता. त्यानंतर नवरा-नवरी हनिमुनसाठी गणपतीपुळे येथे गेले होते. मात्र तिकडे अतिशय धक्कादायक प्रकार घडला.
गणपतीपुळे येथे हनिमूनला गेल्यावर नवरीने नवऱ्याला खोलीत डांबले अन् अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह पळून गेली. त्यामुळे नवरदेव मात्र हादरून गेला. त्याने नवरीच्या कुटुंबीयांना संपर्क केला. यावर त्याने लातूरच्या मध्यस्थांकडे नवरी कुठे आहे, अशी विचारणा केली. आमचे पैसे परत करा, असं म्हटलं. परंतु मध्यस्थांनी आरोप फेटाळत तुम्हीच आमची गायब केलेली नवरी परत आणून द्या, अन्यथा तुम्हाला बघून घेतो अशी नवऱ्याला तंबी दिली. मध्यस्थांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रकार होत असल्याचं पन्हाळा तालुक्यातील एका गावात उघडकीस आलंय.
मग मात्र या तरूणाने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने घडलेल्या प्रकाराची नोंद रत्नागिरी पोलीस ठाण्यात केलीय. पन्हाळा तालुक्यातील तरूणाला नातेवाईक असणाऱ्या एका एजंटने लातूरमधील या मुलीचा फोटो दाखवला होता. या नवऱ्या मुलीच्या आईला तरूणाचे खर्चाला ५० हजार रुपये देण्याच्या अटीवर लग्न जुळविलं होतं. त्यानंतर मुलीला गावाकडे आणलं, लाखो रुपये खर्च करत दारात जोरदार लग्न केलं. हे नवदाम्पत्य हनिमूनसाठी (Honeymoon) गणपतीपुळ्याला गेलं. तिथे नवरदेव झोपेत असताना नवरीने धूम ठोकलीय.