ओबीसी बाबतची भूमिका मांडायची तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे, असे मत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी कोल्हापूर येथे व्यक्त केले.राज्यात अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यात आरक्षणावरून वाक्युद्ध रंगले आहे. त्यावर महसूल मंत्री विखे पाटील हेही वारंवार भूमिका व्यक्त करताना दिसतात.
विखे पाटील म्हणाले, सध्या समाजात ओबीसी – मराठा असा निरर्थक वाद सुरू आहे. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी संयम पाळणे गरजेचे आहे. लोक त्यांच्याविषयी आदराने बोलतात.नंतर त्यांच्यावर वादग्रस्त विधानावरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करावी लागेल. यासाठी त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर जाऊन बोलले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.आरक्षणासाठी राज्य शासन प्रामाणिकपणे भूमिका घेऊन लोकांसमोर जात असताना त्याची विश्वासार्हता अशा घटनांमुळे प्रश्नांकित होत आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्या वेगळ्या भूमिकेविषयी मुख्यमंत्र्यांनी ही विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.