पीएच.डीधारक विद्यार्थ्यांवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते काय दिवे लावणार? अशी टीका केल्यानंतर आता त्याचे पडसाद राज्यभर उमटत असून विद्यार्थ्यांमध्ये संतापाचा सूर उमटला आहे. कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी एकत्र येत अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध करताना 2024 च्या निवडणुकीत विद्यार्थी दिवे लावतील, असा इशारा दिला. Abp माझाने सदर वृत्त दिले आहे.
विद्यार्थी म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीच्या राजकारणावर एखादा विद्यार्थी पीएच.डी करेल ही अजित पवारांना भीती आहे का? असा सवाल पीएच.डीचा अभ्यास करणाऱ्या कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी केला. यावेळी अजित पवार यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्याचा शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून निषेध करण्यात आला. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळणे हे गरजेचे आहे. देशात आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी पीएच.डी मिळवली आहे त्या सगळ्यांचा अपमान अजित पवार यांनी केला आहे, असेही विद्यार्थी म्हणाले.