नगर : ज्याप्रमाणे राज्याच्या मंत्रिमंडळाने विदर्भाला वरदान ठरणाऱ्या ८५ हजार कोटी खर्चाच्या वैनगंगा-पैनगंगा प्रकल्पाला मान्यता दिली, त्याच पद्धतीने पश्चिमेचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात मिळवण्यासाठी नार-पारसारख्या प्रकल्पाला विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मान्यता देण्याचा प्रयत्न आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज, बुधवारी कोपरगावमध्ये बोलताना दिले.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्याोग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांचा अभीष्टचिंतन सोहळा व मतदारसंघातील ३०० कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार माणिकराव कोकाटे, आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राजश्री घुले, माजी खासदार सुजय विखे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पा काळे, डॉ. मेघना देशमुख, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे आदी उपस्थित होते.
कर्मवीर शंकरराव काळे व माजी आमदार अशोकराव काळे या दोघांच्या कार्याचा गौरव करून उपमुख्यमंत्री पवार यांनी, आपण नशीबवान आहोत, काळे परिवारातील तीन पिढ्यांसोबत काम करण्याचे भाग्य आपल्याला लाभले, असेही सांगितले.
कोपरगाव मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर सर्वाधिक निधी आमदार आशुतोष काळे यांनी मिळवला. मतदारसंघात ३ हजार कोटींचा निधी आणणे हे काम ‘येरा गबाळ्याचे नाही’अशा शब्दात गौरव करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘आशुतोषला लै मताधिक्य द्या, मीही त्याला लै निधी देईल’ असे मिश्किल शैलीत सांगितले.