राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी यांनी महंत रामगिरी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करून दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्या प्रकरणी कीर्तनकार भगवान कैलास मोहन उर्फ मधुसूदन महाराज यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अमोल मिटकरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी किर्तनकार मधुसूदन महाराज यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे, १५ ऑगस्ट रोजी रामगिरी महाराज यांनी प्रवचन चालू असताना समाजापुढे काही वास्तुस्थिती दाखवणारे विधानं केले त्यावरून आ. अमोल रामकृष्ण मिटकरी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना जाणीवपूर्वक समाजाच्या भावना आणि श्रध्दा दुखावल्या जातील असे विधान केले. तसेच दोन समाजात शत्रूत्व वाढेल व दोन्ही समाजात दंगा घडवुन आणण्याचे उद्देशाने तसेच त्यांचेतील एकोपा टिकण्यास बाधक अशा कृती कराव्यात या उद्देशाने वक्तव्य केलेले आहे.
महाराष्ट्र तसेच देशातील हिंदु धर्मातील संत परंपरा व तिचे प्रतिष्ठेस जाणीवपूर्वक ठेच पोहचवण्याचे काम केले आहे. तरी त्यांनी हिंदू संत व संन्याशी यांचा तसेच भगवे कपडे घालणाऱ्या साधू-संत यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केलेली असून यामुळे संपुर्ण हिन्दू समाजाची भावना व श्रध्दा जाणीवपूर्वक दुखावली आहे. यामुळे फिर्यादी कीर्तनकार मधुसूदन महाराज यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आ. अमोल रामकृष्ण मिटकरी यांचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो अकोला पोलिसांकडे वर्ग केला आहे.