महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात भाजपच्या विवेक कोल्हे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी युती करत विखे पाटलांना राजकीय विरोध सुरू केला. गणेश कारखाना निवडणूकीत तसेच तीन ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हे-थोरात पॅटर्नने विखे पाटलांना धोबीपछाड दिली. मात्र आता राधाकृष्ण विखे यांनी आपला मोर्चा कोपरगाव मतदारसंघात वळवलाय. कोल्हेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या समवेत विविध विकासकामांचे भूमिपूजन करत भाजपच्या कोल्हे यांच्या विरोधात काळेंना राजकीय बळ द्यायला सुरूवात केलीय.
संवत्सर गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडले. यावेळी झालेल्या नागरिक सत्कार सोहळ्याच्या मंचावर राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांसह राजेश परजणे हे कोल्हेंचे विरोधक एकत्र बघायला मिळाले. माझं पाठबळ तुमच्या पाठीशी असून कुणाचा कसा कार्यक्रम करायचा हे मला माहीत असल्याचं म्हणत विखे पाटील यांनी कोल्हेंवर तोफ डागलीय.