राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारानिमित्त महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांचे नेते राज्यव्यापी दौरे करत आहेत. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे या बाबतीत आघाडीवर आहेत. ते राज्याच्या वेगवेगळ्या भागात लाडकी बहीण योजनेचे मेळावे घेत आहेत. यानिमित्ताने राज्यातील महिलांशी संपर्क साधत आहेत. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या योजनेच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र या जाहिरातीमुळे महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या जाहिरातीच्या नावातून मुख्यमंत्री हा शब्द काढून टाकला आहे. त्यावर आता शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या योजनेच्या जाहिरातीत ‘अजित पवारांनी आणलेली माझी लाडकी बहीण योजना’ असा उल्लेख करण्यात आला आहे. ‘दादाचा वादा’, ‘अजितदादांची लाडकी बहीण योजना’, ‘माझ्या अजितदादाने पैसे पाठवले’ असे संवाद या जाहिरातींमध्ये पाहायला व ऐकायला मिळत आहेत. “महिलांच्या बँक खात्यात येणारे १५०० रुपये ही भेट नाही तर माझ्या दादाचं प्रेम आहे. महिलांच्या स्वप्नांच्या उड्डाणातील छोटा पंख आहे आणि दादा तर एकच आहे. ही दादांची लाडकी बहीण योजना आहे”, अशी एक जाहिरात समाजमध्यमांवर व्हायरल केली जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आमची नाराजी नाही, मात्र यामुळे गैरसमज निर्माण होतात. कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याबद्दल आदर असणे स्वाभाविक आहे. अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा सर्वांचा प्रमुख मुख्यमंत्री असतात. एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना त्यांनी आणली नाही. मुख्यमंत्री हा प्रमुख असतो, त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारने आणली. त्यामुळे श्रेय हे अजितदादांचे, देवेंद्र फडणवीसांचे आणि सर्व मंत्रिमंडळाचे आहे. एखाद्या प्रस्तावाला मंजुरी देताना मंत्रिमंडळ मान्यता देते. उत्साही कार्यकर्त्यांनी योजनेचे नाव बदलू नये. नावात जर बदल केले तर गैरसमज पसरायला वेळ लागणार नाही असे त्यांनी म्हटले.
https://x.com/mahancpspeaks/status/1831175818640269482?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1831175818640269482%7Ctwgr%5E90b1756e442556f89e52f97759549e28cc2340f1%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fladki-bahin-yojana-advertisement-ajit-pawar-eknath-shinde-struggles-to-get-credit-of-scheme-asc-95-4576156%2F