मुंबई : विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. या लाडक्या बहीण योजनेमुळेच महायुतीला सत्ता मिळाल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला. त्यामुळे शपथविधीनंतर आता महायुतीनं लाडक्या बहिणींना दिलेल्या 2100 रूपयांच्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार असा सवाल उपस्थित केला जातोय. मात्र नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी २१०० रुपयांबाबत आगामी अर्थसंकल्पात विचार करणार असल्याचं स्पष्ट केलंय. तर विरोधकांनी मात्र ही योजना जानेवारी पासूनच सुरु करण्याची मागणी केलीय.
लोकसभेला फटका बसल्यानंतर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यानुसार अडीच कोटी महिलांना दीड हजार रुपये महिना याप्रमाणे लाभ देण्यात आला… निवडणुकीपूर्वी या योजनेचा हप्ता दीड हजारावरून एकवीसशे करण्याचं आश्वासन महायुतीने दिलं होतं. मात्र सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या योजनेच्या निकषांवर बोट ठेवलंय… त्यामुळे या योजनेचे निकष काय आहेत?
तर या निकषानुसार डिसेंबरचा हप्ता मिळणार की नव्या निकषानुसार काही लाडक्या बहिणींची नावं गायब होणार याबाबत संभ्रम होता. मात्र नोंदणी केलेल्या सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर डिसेंबरचा हप्ता मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय.
राज्याच्या तिजोरीत असलेला खडखडाट आणि लाडकीच्या वाढीव मानधनाची पूर्तता नवं सरकार कसं करणार याबाबत उत्सुकता आहे. तर दुसरीकडे नव्या निकषांमुळे किती लाडक्या दोडक्या होणार याबाबत राज्यातल्या महिलांचा जीव टांगणीला लागलाय.
लाडकी बहीण योजनेचे निकष काय?
1) कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्याची कागदपत्रं सादर करावी लागणार
2) निवृत्तीवेतन घेणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांच्या कागदपत्रांची अतिरिक्त छाननी होणार
3)5 एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला अपात्र ठरणार
4)एका कुटुंबात फक्त 2 महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार