लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पुन्हा छाननी करण्यात येणार असल्याने अनेक लाडक्या बहिणींमध्ये धाकधूक वाढलीय. मराठवाड्यात आजवर आलेल्या अर्जाची छाननी सुरू झाली आहे. पुण्यात १० हजार लाभार्थ्यांना वगळल्यानंतर मराठवाड्यातील लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.लाडकी बहीण योजनेवरून निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये निवडणूक प्रचारात घमासान झाले. महायुतीचे सरकारचा शपथविधी होऊन एक आठवडा होत नाही तोच योजनेतील लाभार्थ्यांच्या निकषांची पुनर्रचना करण्यात आली आहे. योजनेचा सहावा हप्ता किती लाडक्या बहिणींच्या खात्यावर येणार, याकडे लक्ष लागले आहे.
मराठवाड्यातील २० लाख २५ हजार १२९ महिलांना ६ ऑक्टोबरपर्यंत १ हजार ५१८ कोटी ८४ लाख ६७ हजार ५०० रुपयांचे वाटप केले. त्यासाठी २१ लाख २ हजार १३८ अर्ज या योजनेसाठी आले होते. २० लाख २५ हजार १२९ अर्ज पात्र ठरले. आता अर्जाच्या छाननीमध्ये किती अर्ज बाद होतात आणि किती बहिणींना पुढचा हप्ता मिळतो, हे पाहावं लागणार आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेतील १६ लाख अर्जांची छाननी होणार आहे. आचारसंहितेच्या आधी १६ लाख अर्जांची छाननी बाकी होती. ती आता पूर्ण केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या १६ लाख अर्जांची छाननी करून पात्र अपात्र ठरवून लाडक्या बहिणींना लाभ दिला जाणार आहे.
दरम्यान, महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला लाडकी बहीण योजनेचा खूप चांगला फायदा झाला. ही योजना महायुतीसाठी कलाटणी देणारी ठरली. या योजनेमुळे महायुला खूप चांगली मतं मिळाली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना सहा हप्त्याचे पैसे मिळाले आहे. आता राज्यातील लाडक्या बहिणी डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचे पैसे कधी येणार याची वाट पाहत आहेत.