महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले आहेत. तसंच, अनेक पात्र महिलांच्या खात्यावर पैसेही जमा झाले आहेत. सप्टेंबर महिन्यातही अर्ज करण्यासाठी सरकारने मुदतवाढ दिली आहे. परंतु, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांना कधी पैसे मिळणार याबाबत सरकारकडून अद्याप स्पष्टता करण्यात आलेली नाही. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. नागपूर येथे आयोजित केलेल्या बांधकाम कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
“वर्षाला १८ हजार रुपये म्हणजेच महिन्याला दीड हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात देत आहोत. ज्यांचे ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देऊ. तसंच, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येही पैसे देऊ”, अशी माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.