जिल्ह्यातील बचत गटांच्या महिला होणार लखपती दीदी
सर्व विभागांच्या एकत्रित कृती संगमातुन महिलांना लखपती करा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
अहमदनगर दि ९- लखपती दीदी योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील ७९ हजार ३५७ महिलांची निवड करण्यात आली आहे. सर्व विभागांच्या एकत्रित कृती संगमातून शासकीय योजनांचा लाभ देत उमेद अभियानांतर्गत महिलांना लखपती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लखपती दीदी कार्यक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आषिश येरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कौशल्य व रोजगार विभागाचे सहायक आयुक्त निशांत सुर्यवंशी, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले, उमेद अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये महिला बचत गटांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटातील महिलांना उपजीविका विषयक माहिती देवून महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी काम केले जात आहे. या योजनेचाच एक भाग म्हणून शासनाच्या बचत गटांच्या महिलांना लखपती बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. लखपती दीदी योजनेमध्ये महिलांची निवड करून प्राधान्याने विविध विभागाचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
ग्रामीण भागातील महिलांना उपजीविकेचे स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी उमेदमार्फत वेगवेगळे निधी तसेच बँक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. लखपती दीदी योजनेंतर्गत स्वयंसहाय्यता समुहात सहभागी महिलांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांचे आर्थिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक करण्यासाठीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी एकत्रितपणे व समन्वयातुन या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अधिक प्रमाणात प्रयत्न करावेत. सामुहिक कृती, आर्थिक साक्षरता, कौशल्य विकास अणि उद्योजकीय उपक्रमातून बचतगटाच्या महिलांना अधिक सक्षम करण्याबरोबरच जिल्ह्यातील एकल महिलांना या योजनेत प्राधान्य द्यावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांनी यावेळी दिले.
कमी पाण्यामध्ये शाश्वत उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. ज्या महिलांकडे शेती उपलब्ध आहे अशा महिलांना रेशीम शेती करण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात यावेत. जिल्ह्यात रेशीम कोष खरेदीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने परजिल्ह्यात व परराज्यात जाऊन कोषांची विक्री करावी लागते. रेशीम उत्पादकांचा वाहतुक खर्च कमी होऊन त्यांच्या उत्पन्नात अधिक भर पडावी यासाठी जिल्ह्यात एकाच ठिकाणी कोष विक्रीसाठीची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तालुक्यातील पर्यटन वाढीच्यादृष्टीने पर्यटकांना सर्व सोयी-सुविधा सहजरित्या उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना निवासाची व्यवस्था, परिसरातील प्रसिद्ध खाद्य, बोटींग यासारख्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. त्याचबरोबर पर्यटकांना परिसर फिरण्यासाठी ई-वाहनांचा वापर करण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
यावेळी उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप यांनी सदारीकरणाद्वारे योजनेच्या प्रगतीची माहिती दिली.