Thursday, January 23, 2025

पावणेदोन लाखांची लाच घेताना वकिलाला अटक ,सीबीआय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

इचलकरंजी शहरात थकीत कर्जापोटी बँकेकडून केली जाणारी जप्तीची कारवाई तात्पुरती टाळण्यासाठी १ लाख ७० हजार रुपयांची लाच स्विकारताना एका राष्ट्रीयकृत बँकेचा कायदा सल्लागार अ‍ॅड. विजय तुकाराम पाटणकर याला पुण्याच्या सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. न्यायालयात सीबीआयचे विशेष सरकारी वकिल विद्याधर सरदेसाई यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली.

एका राष्ट्रीयकृत बँकेच्या कोल्हापूर शाखेतून संबंधित तक्रारदाराने ५.५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज थकबाकीत गेल्याने बँकेकडून त्यांच्या घरावर जप्तीच्या कारवाई संदर्भात नोटीस पाठविण्यात आली होती. घरात शुभकार्य असल्याने जप्तीची कारवाई तात्पुरती पुढे ढकलावी, अशी विनंती तक्रारदाराने बँकेचे कायदा सल्लागार अ‍ॅड. पाटणकर यांच्याकडे केली होती. त्यावर जप्तीची कारवाई पुढे ढकलण्यासाठी अ‍ॅड. पाटणकर याने तक्रारदाराकडे अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तडजोडीअंती १ लाख ८० हजार देण्याचे निश्‍चित झाले होते. त्यानंतर तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी राष्ट्रीयकृत बँकेच्या कायदा सल्लागाराच्या विरोधात तक्रार आल्याने त्याची माहिती पुणे येथील सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांना दिली. त्यानंतर तक्रारीची पडताळणी करून तातडीने मंगळवारी रात्री सापळा रचण्यात आला.
इचलकरंजीतील बीएसएनएल कार्यालय परिसरात असलेल्या अ‍ॅड. पाटणकर यांच्या कार्यालयात १ लाख ७० हजाराची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पुणे सीबीआय पथकाचे अधिकारी दीपककुमार व त्यांच्या पथकाने केली. काल अ‍ॅड. पाटणकर याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आला. यावेळी दोन्हीकडील युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अ‍ॅड. पाटणकर यांना १ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास सीबीआयकडून केला जाणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles