Home क्राईम न्यूज राहुरी येथील वकील दाम्पत्य खून खटला, माफीच्या साक्षीदाराने गुन्ह्याची कबुली देत सांगितला...

राहुरी येथील वकील दाम्पत्य खून खटला, माफीच्या साक्षीदाराने गुन्ह्याची कबुली देत सांगितला घटनाक्रम

0

राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अ‍ॅड. राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी अ‍ॅड. मनीषा आढाव यांचे अपहरण आणि नंतर निर्घृण खून प्रकरणी न्यायालयात सुनावणीवेळी सोमवारी माफीचा साक्षीदार हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी) याने गुन्ह्याची कबुली देत 10 लाख रुपयांसाठी पाच जणांनी मिळून कट रचून वकील दाम्पत्याचे अपहरण केले होते, असे सांगितले. दरम्यान, न्यायालयातच चक्कर आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे सुनावणी स्थगित करण्यात आली, अशी माहिती सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांना दिली.

सोमवारी प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू झाली. सरकार पक्षाकडून अ‍ॅड.निकम व मुख्य संशयित आरोपी किरण दुशिंग यांच्यावतीने अ‍ॅड.सतीश वाणी यांनी बाजू मांडली. माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याने न्यायालयासमोर वकील दाम्पत्याचे अपहरण कसे केले, यात कोणकोण सहभागी होते, कट कसा रचला याचा घटनाक्रम सांगितला. घटनाक्रम सांगत असतानाच अ‍ॅड. मनीषा आढाव यांचे हात बांधण्यासाठी वापरलेला गमछा त्याने ओळखला. माहिती देत असतानाच त्याला चक्कर आल्याने सुनावणी स्थगित करून त्याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. सलग तीन दिवस ही सुनावणी होणार असल्याचे अ‍ॅड. निकम यांनी सांगितले.
दरम्यान, न्यायालयासमोरहर्षल ढोकणे याने सांगितले की, 24 जानेवारी रोजी किरण दुशींग, बबन मोरे, भैय्या खांदे, शुभम महाडीक यांनी हॉटेल रॉयल पॅलेस येथे एका वकिलाला उचलायचे व त्याच्याकडून 10 लाख रूपये घ्यायचे, नाही दिले तर त्याचा गेम करायचा असा कट रचला.

मला पैशांची गरज असल्याने मीही त्यात सामील झालो. शुभम याने त्याच्या मित्राचा जामीन करायचा असल्याने पाथर्डी न्यायालयात जायचे आहे, असे अ‍ॅड. आढाव यांना सांगितले होते. त्यानुसार 25 जानेवारी रोजी आम्ही राहुरी न्यायालय येथे जाऊन अ‍ॅड. आढाव यांना किरण दुशींग याच्या वाहनात बरोबर घेतले. तेथून ब्राह्मणीजवळ माऊली हॉटेलच्या अलीकडे निर्जनस्थळी नेऊन त्यांचे हात बांधले. आम्ही पोलीस असून, तुमच्या मुलाने आळेफाटा येथून एका मुलीला पळवून आणले आहे, त्यासाठी आम्ही आलो आहोत, तुम्हाला मॅटर मिटवायचे असेल तर 10 लाख रूपये द्या, असे वकिलाला सांगितले. त्यानंतर वकिलाला त्याच्या पत्नीला फोन करून मोहटादेवीला जायचे असे खोटे सांगायला लावले व त्यांच्या ओळखीच्या शुभम याला मनीषा यांना आणायला पाठवले. शुभम त्यांना घेऊन आल्यावर त्यांनाही वाहनात बसवले. तुमच्या घरी बसून चर्चा करू असे त्यांना सांगत आम्ही त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेलो, असे हर्षल ढोकणे याने न्यायालयात सांगितले.