राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अॅड. राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी अॅड. मनीषा आढाव (दोघे रा. मानोरी, ता. राहुरी) यांच्या अपहरणानंतर त्यांच्या डोक्यात प्लास्टिक पिशवी घालून, त्यांचे हात- पाय साडीने बांधून, त्याला दगडाची गोणी बांधून त्यांना उंबरे गावातील स्मशानभूमीजवळ विहिरीत टाकले. तसेच अॅड. आढाव यांच्या एटीएममधून काही रक्कम संशयित आरोपींनी काढून घेतली, अॅड. आढाव यांच्या पत्नीच्या हातातील ब्रेसलेट काढून घेतल्याचे माफीचा साक्षीदार हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी) याने न्यायालयासमोर सांगितले. दरम्यान संशयित आरोपीच्या वकिलांकडून ढोकणे याची उलट तपासणी सुरू झाली आहे.
मंगळवारी ढोकणे याने पुढील घटनाक्रम सांगितला. आढाव दाम्पत्याला त्यांच्याच घरात बाधून ठेवले होते. तेथे त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेऊन पैसे काढून घेतले. हातातील ब्रेसलेट काढून घेतले. न्यायालयात या दोन्ही वस्तू ढोकणे याने ओळखल्या. संशयित आरोपींनी आढाव यांच्याकडे अधिक रकमेसाठी तगादा लावला. त्यानंतर आढाव यांचीचे वाहन घेऊन त्यांना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास उंबरे येथील स्मशानभूमी येथे आणले. त्यांचे हात, पाय बांधले, दगडाची गोणी बांधून विहिरीत टाकले. तेथून आढाव यांचे वाहन राहुरी न्यायालयाच्या आवारात आणून लावले. संशयित आरोपी तेथून जात असताना तेथे पोलिसांचे एक वाहनही आले होते, असे ढोकणे याने सांगितले.
त्यानंतर माफीचा साक्षीदार ढोकणे याची संशयित आरोपीचे वकील सतीश वाणी यांनी उलटतपासणी सुरू केली. मी न्यायदंडाधिकारी यांनी नोंदविलेला जबाब वाचून पाहीला होता. मी 27 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पोलिसांच्या ताब्यात होतो. मला त्यांनी गुन्ह्याबद्दल विचारपुस केली होती. त्या चौकशीदरम्यान माझेकडून काहीही लिहून घेतले नव्हते. एलसीबीने मला गुन्हासंबंधी कबूली जबाब द्यायचा का, असे सांगितले नव्हते. मी पोलिसांना सांगीतले होते की, मला पश्चाताप झाला आहे, असे ढोकणे याने सांगितले.