सध्या राज्यातील सर्वच पक्षांकडून महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यातच आता ठाकरे गटाकडून आगामी महापालिकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महापालिका आम्ही स्वबळावर लढू, अशी मोठी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे.
“मुंबईपासून नागपूरपर्यंत महापालिका आम्ही स्वबळावर लढणार”, अशी मोठी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. “मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला पाहायचंच आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
“मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल. एकदा आम्हाला पाहायचंच आहे. नागपूरलाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. आताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता असं आमचं ठरतंय की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल… कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपपले पक्ष मजबूत करावेत”, असे संजय राऊत म्हणाले.
काही दिवसांपूर्वी भाजप खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधताना महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. यापुढे भविष्यात आम्ही निवडणुका स्वबळावर लढू. मुंबई महापालिकेच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवेल. मुंबईत भाजपची प्रचंड ताकद आहे, असे नारायण राणे म्हणाले होते.