राजकीय मुद्द्यांवर सर्वेक्षण, अंदाज, मतचाचणी अशा विविध गोष्टींवर काम करणाऱ्या लोकपोलनं केलेल्या सर्व्हेचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. लोकपोलनं त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर हे निष्कर्ष जाहीर केले असून त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी बहुमत मिळवू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, महायुतीला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळतील, मात्र त्या सत्तास्थापनेसाठी अपुऱ्या असतील, असंही या निष्कर्षांमध्ये दिसून आल्याचा दावा लोकपोलकडून करण्यात आला आहे.
लोकपोलनं या निष्कर्षांबरोबरच हा सर्व्हे नेमका कसा करण्यात आला होता? याची माहिती दिलेली आहे. त्यानुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधून ५०० मतदार अशा प्रकारे राज्यभरातील मतदारसंघातून जवळपास दीड लाख मतदारांचा या सर्व्हेमध्ये समावेश करण्यात आला होता. मतदार निवडण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातील ३० मतदान केंद्रं निवडण्यात आली. २० ते ३० ऑगस्ट या १० दिवसांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. राज्यभरातल्या एकूण आकडेवारीप्रमाणेच महाराष्ट्रात विभागनिहाय निकाल कसा दिसू शकेल, याचाही अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे.
लोकपोलनं त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १४१ ते १५४ जागा मिळतील. तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीला ११५ ते १२८ जागा मिळू शकतील. अपक्ष व इतर छोट्या पक्षांच्या मिळून ५ ते १८ जागा महाराष्ट्रात जिंकून येऊ शकतात. या आकडेवारीनुसार राज्यात महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ जुळवण्यात यश मिळू शकेल, असं दिसून येत आहे.
https://x.com/LokPoll/status/1833106740281225560?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1833106740281225560%7Ctwgr%5E1c3d85bea519dc0e63adb3519baed15dbb474cdf%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Felections%2Flokpoll-survey-predicts-mva-government-in-maharashtra-bjp-led-mahayuti-in-opposition-pmw-88-4587134%2F