Wednesday, June 25, 2025

लोकसभा निवडणूक… नगरमधील उमेदवारांचा अंतिम प्रचार खर्च आयोगाला सादर…

नगर : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचा प्रचारावरील एकूण खर्च आता जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नगर मतदारसंघात सर्वाधिक खर्च, महायुतीतील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी ८३ लाख ४९ हजार २२७ रुपये तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) विजयी उमेदवार नीलेश लंके यांनी ६५ लाख ४५ हजार २६८ रु. इतका खर्च सादर केला आहे. या खर्चावर निवडणूक निरीक्षक शक्तीसिंग तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शिक्कामोर्तब करुन निवडणूक आयोगाला सादर केला आहे.

नगर लोकसभा मतदारसंघात २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या सर्व उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला आहे.

तिसऱ्या क्रमांकावरील खर्च वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप खेडकर यांनी दाखवला आहे. त्यांनी एकूण १२ लाख ७४ हजार ५२४ रुपयांचा खर्च सादर केला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी खर्च मर्यादा ९५ लाख होती. निवडणूक खर्चात अर्ज दाखल करणे ते निवडणूक निकाल दरम्यानच्या प्रचार खर्चाचा समावेश केला जातो. याच्या पडताळणीसाठी नगर मतदारसंघात जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी शैलेश मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथक तयार करण्यात आले होते. या पथकाकडे उमेदवारांनी खर्च सादर केला. उमेदवारांनी सादर केलेला खर्च व निवडणूक यंत्रणेने केलेली पडताळणी याचा ताळमेळ घालत खर्च ठरवला गेला आहे.

तफावत आढळल्यास उमेदवारांना नोटिसा पाठवल्या जात होत्या. मात्र कोणत्याही उमेदवाराने या नोटिसांना आव्हान दिलेले नाही. एकूण ३ वेळा खर्चाचा ताळमेळ घातला गेला. अंतिम ताळमेळ दि. ४ जुलै रोजी निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत घातला गेला. मतमोजणी नंतर ३० दिवसांनी अंतिम ताळमेळ घालण्याची मुदत निवडणूक आयोगाने ठरवून दिली होती. त्यानंतर आता हा खर्च निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नगर शहरातील प्रचारसभेवर ३९ लाख रुपयांचा खर्च दाखवण्यात आलेला आहे, मात्र हा खर्च महायुतीचे नगरमधील उमेदवार विखे व शिर्डीतील उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यामध्ये विभागून दाखवला गेला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles