काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या चार पक्षांमध्ये लोकसभेच्या 48 जागांची समान विभागणी करावी. प्रत्येकी 12 जागा घेऊन सर्व पक्षांनी एकत्रित मोदींचा पराभव करावा असा आमचा फॉर्म्युला असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीची बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.
महाविकास आघाडीतील तीनही पक्ष केंद्रामध्ये स्वबळावर पर्याय होऊ शकण्याच्या परिस्थितीत नाहीत. दोन पक्ष फुटीमुळे कमकुवत आहेत. काँग्रेसचा मागच्यावेळी एकच खासदार होता. त्यामुळे हे तीनही पक्ष पर्याय होऊ शकत नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीतून अस दिसून आले आहे की, वंचित बहुजन आघाडीकडे मते आहेत. गेल्या पाच वर्षांत वंचित चा जनाधार वाढला असल्याचं रेखाताई ठाकूर यांनी स्पष्ट केले.