मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडलेला असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून विदेशात गेले आहेत. विभागीय बैठकीलासुद्धा मंत्री उपस्थित नसतात. खरिपासाठी कृषिमंत्र्यांनी जिल्हावार, विभागवार बैठक घेण्याची गरज असताना ते शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी रांगेत उभे करुन थंड हवेच्या ठिकाणी गेले आहेत. राज्याला लुबाडण्याचे काम सुरू असून सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती आली आहे,’ अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. छत्रपती संभाजीनगर येथे ते माध्यमांशी बोलत होते.
मराठवाड्यातील दुष्काळ गंभीर असून अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. पंचनामे होऊनही शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. राज्यात दुष्काळाचे संकट असताना आणि शेतकरी बियाण्यांसाठी रांगेत असताना कृषीमंत्री परदेशात गेले आहेत. मराठवाड्यात गंभीर संकट असताना कृषीमंत्री परदेशात कसे जाऊ शकतात ? मंत्री या महिन्यात परिस्थितीचा आढावा घेत असतात. मात्र, मुंडे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून गेले आहेत. निवडणूक संपल्यामुळे त्यांचे काम संपले असावे. सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. मराठवाड्यात तीन महिन्यात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. शेतकरी आत्महत्या हे राज्याचे दुर्दैव आणि शासनाचे अपयश आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.