संगमनेर तालुक्यातील झोळे येथील वृद्धाच्या खुनाचा तपास लावण्यात येथील पोलिसांना अखेर यश आले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने या वृद्धाचा खून केल्याचे पोलीस तपासात नुकतेच निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की, झोळे गावातील साहेबराव उनवणे (वय ७७) यांचा मृतदेह (दि.५) ऑगस्ट रोजी पहाटेच्या दरम्यान त्यांच्या नेहमीच्या झोपण्याच्या ठिकाणी पलंगावर आढळून आलेला होता. त्यांच्या डोक्यावर जखमा असल्याने हा हत्येचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना होता.
संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात संगमनेर तास ठाण्यात करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर घटनास्थळीच एक पेनाने लिहिलेली चिठ्ठी देखील मिळून आली होती.त्या चिठ्ठी नुसार झारखंड मधील एका व्यक्तीने खंडणी घेऊन हा खुन केल्याचे नमूद केले होते. खुनाचा हा प्रकार गुंतागुंतीचा असल्याने या प्रकरणाचा तपास करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.घटनास्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी भेटी दिल्या होत्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्ह्याचा तपास करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ बाघचौरे यांनी तीन पथके तयार केली.
या पथकातील कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या अंगाने खून प्रकरणाचा तपास केला. मयत व्यक्तीच्या कुटुंबातील सर्व सदस्य, त्याचे मित्रपरिवार, त्यांचे नातेवाईक तपासणे, त्याचप्रमाणे घटनास्थळ परिसरावर जाणाऱ्या सर्व रस्त्यांची सीसीटीव्ही तपासणे, परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणे,घटनास्थळी मिळून आलेल्या चिठ्ठीत नमूद केल्याप्रमाणे झारखंड मधील व्यक्तीचा तपास करण्याचे काम पोलिसांनी केले. घटनास्थळावर सापडलेल्या चिड्डीत उल्लेख असलेल्या झारखंड मधील व्यक्तींकडे पोलिसांनी तपास केला.चिठ्ठीत लिहिलेले अक्षर, झोळे ते संगमनेर दरम्यान महामार्गावरील संपूर्ण सीसीटीव्हीचा केलेला अभ्यास व मोबाईलचा आरोपीने अतिशय चलाखीने केलेल्या वापराचे विश्लेषण यावरून पोलिसांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने तपास केला.
त्यात भूषण कांताराम बाळे (रा. झोळे) याने हा खून केल्याचे तपास स्पष्ट झाले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. झारखंड येथे असलेल्या एका मुलीशी या आरोपीची इंस्टाग्राम वरून ओळख झाली होती.ओळखीचे रूपांतर इंस्टाग्राम वरच प्रेमात झाले होते आणि हे इंस्टाग्राम वरील प्रेम टिकवण्यासाठी व पुढे नेण्यासाठी अडथळा येऊ नये, यासाठी या आरोपीने हा खून केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
दरम्यान, या घटनेतील आरोपीवर यापूर्वी देखील खून व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. वृद्धाच्या खून प्रकरणात त्याला कोणी सहकार्य केले आहे का, याचा तपास पोलीस करीत आहे.