Sunday, July 21, 2024

शेअर व फॉरेक्स मार्केटचे आमिष, अहमदनगर जिल्ह्यात व्यावसायिकाची 11 लाखांची फसवणूक

नगर-शेअर मार्केट व फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा व बायनरी बोनस देण्याचे आमिष दाखवून राहुरी येथील व्यावसायिकाची 11 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. संदीप बाबुराव कोठुळे (वय 43 रा. साखर कारखाना कामगार वसाहत, श्रीशिवाजीनगर, राहुरी) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी मंगळवारी (18 जून) येथील कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द फसवणूक, एमपीआयडी आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीमंता बाझार (ओपीसी) प्रा. लि. कंपनीचे सीईओ एच. आर. श्रीकांत आचार (वय 60 रा. विशालनगर, पुणे), धर्मेंद्रसिंग सेगर (रा. बुधती, होरंगाबाद, भोपाळ, मध्यप्रदेश), दिनेश योगेश भटनाकर (रा. विशालनगर, पुणे), साजिद शेख (रा. कोंढवा, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदरची घटना 18 डिसेंबर 2021 ते 23 डिसेंबर 2021 दरम्यान झाली असून जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कोठुळे हॉटेल व्यावसायिक असून त्यांना त्यांच्या मित्राकडून आर्थिक गुंतवणूक करणार्‍या श्रीमंता बाझार (ओपीसी) कंपनीची माहिती मिळाली होती. या कंपनीचे सीईओ आचार यांनी नगर शहरातील एका हॉटेलमध्ये सन 2021 मध्ये कार्यशाळा आयोजित केली होती. त्या कार्यशाळेला कोठुळे हजर होते.

या कार्यशाळेत कोठुळे यांच्यासह इतरांना आचार व त्याच्या सहकार्‍यांनी शेअर ट्रेडींग व फॉरेक्स मार्केट बाबत माहिती दिली. कंपनीत गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा व बायनरी बोनस देतो असे आमिष दाखवून सदर गुंतवणूक करणार्‍या कंपनीवर विश्वास ठेवण्यासाठी अ‍ॅग्रीमेंट करून दिले. दरम्यान, कोठुळे यांनी कंपनीत टप्प्याटप्याने 11 लाख 20 हजार रुपयांची गुंतवणूक केली. काही दिवसांनी कंपनीने आपले कार्यालय बंद केले. कोठुळे यांना कंपनीने गुंतवणूक केलेल्या रकमेसह इतर कोणताही परतावा दिला नाही. त्यांनी याबाबत सीईओ आचार व त्याच्या सहकार्‍यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles