राज्यातील लोकसभा निवडणुकांचे मतदान पार पडल्यानंतर सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. निकालाबाबत अनेक अंदाज वर्तवले जात असून आपलेच नेते विजयी होणार असे म्हणत कार्यकर्त्यांमध्ये अगदी लाखोंच्या पैजा लावल्या जात आहेत. माढा लोकसभा मतदार संघातही धैर्यशिल मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तब्बल ११ बुलेटची पैज लागली होती. मात्र आता अंतिम टप्प्यात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समर्थकाने माघार घेतली आहे.
माढा तालुक्यातील बावी येथील मोहिते पाटील समर्थक निलेश पाटील यांनी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हेच विजयी होणार असा दावा करत ११ बुलेट गाड्याची पैज जाहीर केली होती. तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक अनुप शहांनी पाटील यांचे चॅलेज स्विकारात पैजेचा विडा उचलण्यासाठी पुढे आले होते.
मात्र आता 11 बुलेट गाड्यांची पैज लावणारे मोहिते पाटील समर्थक निलेश पाटील यांनी अखेर माघार घेतली आहे. तर भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर समर्थक अनुप शहा मात्र आजही पैज लावण्यावर ठाम आहेत. कायद्याच्या धाकामुळे आपण पैजेतून माघार घेतल्याचे निलेश पाटील यांनी म्हटले आहे, तर पैजाचा विडा उचलणाऱ्या फलटणच्या अनुप शहा यांनी मात्र होऊ दे गुन्हा मी पैज लावण्यास तयार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे.