उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अनेक दिवसांपासून बुलडोझर कारवाईमुळे चर्चेत आहेत. दंग्यातील आरोपींच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर फिरवण्यात आल्याचं उत्तर प्रदेशातून समोर आलं होतं.तोच कित्ता आता मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री गिरवत आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तीन मोठे निर्णय घेतले. त्यांची अमलबजावणीही सुरु झाली आहे.
मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोहन यादव यांनी तीन मोठे निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावले आहे. अतिक्रमणांवर कारवाई, उघड्यावर मटन-मासे विक्रीस बंदी, धार्मिक स्थळांवरील ध्वनीक्षेपकावर बंदी असे तीन निर्णय यादव सरकारने घेतले आहे. याबाबत त्यांनी नियमावली जाहीर केली आहे. त्यांचे पालन न केलेल्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
मध्य प्रदेशचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांनी शपथ घेतली अन् दुसऱ्याच दिवशी भोपाळमध्ये बुलडोझर फिरला. महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अतिक्रमण करून घर बांधले होते. महापालिकेच्या नियमांचेही उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे त्यांचे घर उद्ध्वस्त करण्यात आले आहे.