लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे जागावाटपावरून राजकीय पक्षांमध्ये जबरदस्त रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे.
माहितीनुसार, महाविकास आघाडीने लोकसभेच्या जागावाटपासाठी दोन फॉर्म्युले निश्चित केले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्यास महाविकास आघाडीचा २०-१५-९-४ असा जागावाटपाचा फॉर्म्युला असेल.
यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला २० जागा, काँग्रेस पक्षाला १५ जागा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला ९ जागा, वंचित बहुजन आघाडीला ४ जागा असणार आहेत. वंचित बहुजन आघाडीला शिवसेना गटाच्या कोट्यातून २, काँग्रेसच्या कोटातून १ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोट्यातून १ जागा देण्यात येईल.
जर वंचितने ४ जागा घेण्यास नकार दिल्यास, २२-१६-१० असा फॉर्म्युला असेल. यामध्ये ठाकरे गटाला २२ जागा, काँग्रेसला १६ जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला १० जागा मिळणार आहे.