Thursday, September 19, 2024

विधानसभेच्या रणांगणात उतरवण्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना गळ !

विधानसभेसाठी भाजप कमालीचा सावध झाला आहे. त्यातही संघानं भाजपच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी रणनिती आखली आहे. पाहूया काय आहे संघाचा विधानसभेसाठी प्लॅन…लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी कमालीच्या सावध झालेल्या भाजपनं आता ताकही फुंकून प्यायचं ठरवलंय. त्यादृष्टीनं नियोजन सुरु झालंय. त्यासाठी आरएसएसनं रणनिती आखल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. भाजपचा केंद्रीय पातळीवरील आश्वासक चेहरा विधानसभेच्या रणांगणात उतरवण्याचा सल्ला संघाने भाजपला दिल्याची चर्चा आहे. यासाठी संघानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना गळ घालण्यात बोललं जातंय.

सद्यस्थितीत भाजपपुढे महाराष्ट्रात अनेक मोठी आव्हाने उभी आहेत. मराठा आरक्षण आणि इतर प्रश्नांमुळे महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची लोकप्रियता काहीशी घटल्याचं चित्र आहे. त्यामुळे या प्रतिकुल परिस्थितीत संघाच्या काही नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आगामी विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावावी असा सल्ला दिला आहे. गडकरी यांनी केवळ प्रचारातच नव्हे तर निवडणुकीच्या नियोजनातही अधिकचे लक्ष घालावे, असे त्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रासाठी गडकरींना गळ का? आश्वासक चेहऱ्यामुळेच गडकरींवर संघाची मदार आहे. नितीन गडकरी यांचा विकासात्मक चेहरा भाजपला उपयुक्त ठरण्याचा अंदाज आहे. केंद्रातला मराठमोळा कतृर्त्ववान मवाळ चेहरा म्हणून नितीन गडकरी परीचित आहेत. गेली काही वर्ष केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामांमुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात सर्वच पक्षांशी गडकरींचे सलोख्याचे संबंध आहेत. शरद पवार, राज ठाकरे आणि अन्य नेत्यांशी गडकरींचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे महाराष्ट्र भाजपसाठी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ते उपयुक्त ठरतील, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मत आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील परिस्थितीचा विचार करता, अनुभवी नेत्यांना परत आणण्याची गरज आहे का, याची चाचपणी भाजप आणि संघाचे नेते करत आहेत. भाजपकडून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणापासून नितीन गडकरी काहीसे लांब आहेत. त्यामुळे विधानसभेला त्यांचा सहभाग कशा प्रकारचा असेल, उमेदवारांची निवड आणि प्रचारात ते दिसणार का, याबाबत चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. खरंच गडकरींनी विधानसभेसाठी पुढाकार घेतला तर मविआलाही रणनिती बदलावी लागेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles