मुंबई : जम्मू-काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. जम्मू-काश्मीरमधील निवडणुका झाल्यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे राज्यात लवकरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीची घोषणा करण्याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुका जाहीर करण्याआधी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रमुख पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी तयारी केली असताना दुसरीकडे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी निवडणुकीसाठी बैठकांचा सपाटा लावला आहे.
मुख्य निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील आढावा घेतला. निवडणुकीसाठी सर्व जिल्हातील कायदा आणि सुवस्था त्याच मतदानासाठी किती कर्मचारी आहेत, यांची माहिती घेण्यात आली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी लागू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम ही २७ आणि २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौरा करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आगामी निवडणुकीसाठी राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मतदान केंद्रांची संख्या आता १० हजार १११ इतकी झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी २०८ मतदान केंद्रे वाढले आहेत. आता एका केंद्रावर मतदानाची सरासरी १२०० ते १३०० इतकी करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर सुसूत्रीकरणासाठी मतदान केंद्रात वाढ केली आहे.