विधानसभा अधिवेशनात शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील सभागृहात भाषण करत असताना त्यांच्या भाषणातील एक चूक अजित पवारांनी सुधारली. त्यानंतर जयंत पाटील यांनी अजित पवारांकडे पाहत केलेल्या एका विधानामुळे चर्चा रंगली आहे. ‘आपल्या पक्षाचं एक वाक्य आहे, योग्यवेळी योग्य निर्णय’, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. मात्र, त्यांच्या या विधानाची मोठी चर्चा रंगली आहे. जयंत पाटील यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील यांच्याबाबत मोठं विधान केलं. “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेतील”, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं. दरम्यान, यानंतर आता शिवसेनेचे (शिंदे) नेते उदय सामंत यांनीही भाष्य केलं आहे. ‘जयंत पाटील महायुतीमध्ये येणार असतील तर नक्कीच आम्हाला अभिमान वाटेल, चांगलं वाटेल’, असं उदय सामंत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.
जयंत पाटील यांच्या भाषणात झालेले उल्लेख काही वेगळे संकेत आहेत का? या प्रश्नावर बोलताना उदय सामंत म्हणाले, “ज्यावेळी विनोदाने काही चर्चा होते. सभागृहात अजित पवार जेव्हा म्हणाले की माझं पूर्ण लक्ष तुमच्यावर आहे. त्यानंतर जयंत पाटील असं बोलले आहेत की दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ब्रीद वाक्य आहे की योग्य वेळी योग्य निर्णय. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय जयंत पाटील यांचा कसा होतो? याकडे आमचं सर्वांचं लक्ष लागलं आहे”, असं सूचक विधान उदय सामंत यांनी म्हटलं आहे.