राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, अशाप्रकारे बंद घोषीत करणे बेकायदा असून कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाचा हा निर्देश महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे. यावरून आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या या बंद विरोधात आज वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज तातडीची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने अशाप्रकारे बंद घोषीत करता येणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच बंद घोषीत करणे बेकायदा असून जर उद्या कुणी अशाप्रकारे बंद पुकारतील त्यांच्यावर कारवाई करा, असे निर्देशही न्यायालयाने दिले.
“बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मुंबई उच्च न्यायालय यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते”, असं शरद पवार म्हणाले आहेत
यानंतर नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नाना पटोले म्हणाले, “उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करून आम्ही उद्या काळा झेंडा घेऊन आणि तोंडाला काळी पट्टी बांधून उद्या सकाळी ११ वाजता आंदोलन नाही मात्र आम्ही एकत्र बसणार आहोत. यासंदर्भातील सूचना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात दिलेल्या आहेत. आम्ही बंद करणार नाही, जनतेनं बंद केल्यास संबंध नाही”, असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं.
“उच्च न्यायालयाने हा निर्णय ज्या तत्परतेने दिला त्याच तत्परतेने महाराष्ट्रात जे गुन्हे घडत आहेत. त्या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा देण्याची तत्परता दाखवावी. उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवावा लागतो. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. मात्र, त्यामध्ये काही अवधी लागू शकतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आता वेळ नाही. त्यामुळे आम्ही आता ठरवलं आहे की, उद्याचा बंद आम्ही मागे घेत आहोत. मात्र, महाराष्ट्रभर आम्ही महाविकास आघाडीची सर्व नेते आणि कार्यकर्ते हातामध्ये काळे झेंडे घेऊन आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आम्ही घडलेल्या घटनांचा निषेध करणार आहोत”, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.