भाजपच्या राष्ट्रीय सचिव, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाची आता राज्यसभेसाठी चर्चा सुरू झाल्याने कार्यकर्त्यांचा हुरुप वाढला आहे. मागील साडेचार वर्षांपासून भाजपकडून कायम टाळले जाणे, आगामी काळात विधानसभा निवडणुकीत महायुतीत परळीच्या जागेचा पेच, यामुळे आता पंकजा मुंडेंना राज्यसभा मिळाली तर सगळेच कळीचे मुद्दे आपोआप निकाली लागतील, असा त्यांच्या समर्थकांचा आशावाद आहे.
देशातील राज्यसभेच्या 56 जागांची प्रक्रिया सुरू झाली असून यात पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत आल्याने समर्थकांना हायसे वाटत आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे लोकसभा व विधानसभेचा पेचही निकाली निघणार आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे सक्रिय झाल्या आहेत. राज्यात नवे समीकरण झाले तसे त्यांचे व बंधू कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यातील कौटुंबिक संबंधदेखील पूर्वीप्रमाणे झाले आहेत. आता राज्यसभेची उमेदवारी पंकजा मुंडेंना भेटली तर सर्वच प्रश्न निकाली निघतील, अशी आशा त्यांच्या चाहत्यांना आहे.