भारतीय जनता पक्षाचे (भाजप) विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश उर्फ जे. पी. नड्डा यांचा विस्तारित कार्यकाळही आठवडाभरात संपुष्टात येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना भाजपचे नवे अध्यक्षही निवडावे लागतील. या पदासाठी भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, राधामोहन अग्रवाल; तसेच केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची नावे आघाडीवर आहेत. केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र प्रदेश भाजपमध्ये भाकरी फिरवण्याचे ठरवले, तर केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नावाचा विचार दिल्ली दरबारी सुरू आहे. अलीकडे लोकसभेच्या तिकीटासाठी मुंबईला अनेक वाऱ्या करणारे कराड यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले ट्युनिंग निर्माण झाल्याचे सांगितले जाते.