दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून दिली जाणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते. प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल इाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत पालक, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दिली जाणार आहेत. गेल्या वर्षी देखील वेळ वाढवून देण्यात येत आहे. फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षांचा वेळी ही सकाळ सत्रात सकाळी 11.00 वाजता तसेच दुपार सत्रात दु.3.00 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकाचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. सकाळ सत्रात स. 10.30 वाजता तसेच दुपार सत्रात दु. 2.30 वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे