Saturday, May 25, 2024

ओपनिंगपोलची आकडेवारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना धक्का, पक्ष फुटीला ‘लोक’ मान्यता नाही !

भारतात सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्साहाला सुरुवात झाली आहे. येत्या 19 एप्रिलला म्हणजेच पुढच्या तीन दिवसांनी देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या मतदानाच्या तीन दिवस आधी TV9 चा सर्वात मोठा ओपिनियन पोल समोर आला आहे. कारण या निवडणुकीत पक्षफुटीला मान्यता नाही, असा संदेश महाराष्ट्राची जनता देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड घडामोडी घडल्या आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दोन बड्या पक्षांमध्ये फूट पडली आहे. त्यानंतर आता देशाची सर्वात महत्त्वाची लोकसभा निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत पक्ष फुटीला लोकमान्यता नाही, असंच दिसण्याची शक्यता आहे. कारण ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला केवळ तीन जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष भुईसपाट होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांमध्ये प्रचंड मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. या सरकारला कोरोना संकटाचा सामना करावा लागला. कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर काही महिन्यांनी हे सरकार कोसळलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड हे महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्याला कारणीभूत ठरलं. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या अर्ध्या पेक्षा जास्त आमदारांना घेऊन आधी सुरतला गेले. त्यानंतर तिथून ते गुवाहाटीला गेले. सुरुवातीला काही आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचा दावा करत होते. पण नंतर ते सुद्धा गुवाहाटीला गेले. यानंतर सरकार स्थापनेनंतर सर्वजण महाराष्ट्रात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत नवं सरकार स्थापन केलं. हे सरकार वर्षभर चालल्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे देखील अतिशय नाट्यमयरित्या सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली. शरद पवार यांनी अजित पवार यांच्या भूमिकेला विरोध केला. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले.

विशेष म्हणजे दोन्ही पक्षांच्या गटांनी कायदेशीर लढाई देखील लढली. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला मुख्य शिवसेना म्हणून मान्यता दिली. तर अजित पवार यांच्या गटाला मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली. सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांना घेण्यास सांगितला. विधानसभा अध्यक्षांनी सत्ताधारी दोन्ही गटांना दिलासा दिला. विधानभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाच्या निकालानुसार निकाल दिला. यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात ठाकरे गट आणि शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरु आहे. पण या सर्व राजकीय घटनांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचं मत काय आहे, त्यांची भूमिका काय आहे? ते आता कायदेशीरपणे लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीआधी आलेल्या ओपनिंगपोलची आकडेवारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना धक्का देणारी आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles