भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याचबरोबर शिवसेनेचे प्रताप सरनाईक, संजय शिरसाट यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. चंद्रशेखर बावनकुळे, प्रताप सरनाईक आणि संजय शिरसाट एकेकाळी रिक्षाचालक होते. रिक्षाचालक ते राज्याचे मंत्री असा प्रवास या नेत्यांनी केल्याने सध्या सोशल मीडियावर या नेत्यांबद्दल अनेक चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे देखील एकेकाळी रिक्षाचालक असल्याने सध्या सोशल मीडियावर आधी रिक्षावाला CM आणि आज 3 रिक्षावाले मंत्री असा मेसेज सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी लग्नाच्या निर्णयामुळे घरात वाद झाल्याने त्यांनी काही काळ रिक्षा चालवली होती असा खुलासा त्यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना केला होता. तर प्रताप सरनाईक यांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ रिक्षा चालवली होती. त्यानंतर सरनाईक राष्ट्रवादीचे सदस्य झाले आणि 1997 साली त्यांनी सक्रिय राजकरणामध्ये उडी घेतली. तर संजय शिरसाट सुरुवातीला रिक्षाचालक होते. बाळासाहेबांच्या विचाराने ते अत्यंत भारावले आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.