मराठा समाजामध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल असंतोष असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना मान्य केलं. “भाजपाने मराठा समाजाला वेळोवेळी आरक्षण आणि सुविधा दिल्या. मात्र, पण त्यानंतरही मराठा समाजात भाजपाबद्दल असंतोष आहे असं आमच्या चर्चेतून समोर आलं आहे. हा असंतोष का आहे? यावर आमची सविस्तर चर्चा झाली. शेवटच्या मराठा माणसापर्यंत आम्ही दिलेल्या गोष्टींबाबत माहिती पोहोचवण्यात, योजनांची मदत पोहोचवण्यात कमी पडलो आहोत. ही माहिती मराठा समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.भाजपानं इतक्या सगळ्या गोष्टी करूनही मराठा समाजाचा भाजपावर रोष का आहे? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. “पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण आणि सवलती या गोष्टी वेगळ्या केल्या. आरक्षण मिळेपर्यंत ओबीसींच्या सगळ्या सवलती मराठा समाजाला दिल्या. हे इतिहासात पहिल्यांदा घडलं. हे देवेंद्र फडणवीसांनी केलं. २०१७ साली मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात टिकवलं. ते गेलं उद्धव ठाकरेंच्या काळात. पुन्हा मिळवलं एकनाथ शिंदेंच्या काळात. तरी मराठा समाजाचा रोष आहे? यासाठी आम्ही विचारमंथन केलं. त्यातून आणखी काही गोष्टी करण्याचे मुद्दे आले”, असं ते म्हणाले.