मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते ठाण्यात पार पडला. या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं. “अजित पवार यांनी आणि मी (देवेंद्र फडणवीस) जो रेकॉर्ड केला, तो रेकॉर्ड कोणीही मोडू शकत नाही”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
“अजित पवार यांनी बोलताना काही गोष्टी सांगितल्या. अजित पवार हे अर्थमंत्री आहेत, त्यामुळे अर्थमंत्र्यांचं कामच असतं की, कुठलीही फाईल आली की त्या फाईलवर असं काहीतरी लिहायचं की ती फाईल फिरून पुन्हा त्याच ठिकाणी गेली पाहिजे. त्यामुळे अजित पवारांनी बरोबर अर्थमंत्र्यांचं काम केलेलं आहे”, असं फडणवीस म्हणाले.
“अजित पवार यांनी बोलताना सांगितलं की ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत आणि तेच आमच्यामागे राहून गेले. मात्र, अजित पवारांनी आणि मी (देवेंद्र फडणवीस) जो रेकॉर्ड केला आहे, तो रेकॉर्ड कोणीही मोडू शकत नाही. म्हणजे ७२ तासांचा आपला रेकॉर्ड तर आहेच. पण त्याही पेक्षा वेगळा रेकॉर्ड म्हणजे, मी असा मुख्यमंत्री झालो की, एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्रीही झालो, विरोधी पक्षनेताही झालो आणि उपमुख्यमंत्रीही झालो. अजित पवार हे देखील एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री झाले, विरोधी पक्षनेतेही झाले आणि पुन्हा उपमुख्यमंत्री झाले”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचं कौतुक केलं.