नगर: महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेस मान्यता देण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक अक्षमतेनुसार सहाय साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी त्याचप्रमाणे प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरित करण्यात येणार आहे.
शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व असणाऱ्या १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ६५ वर्षांवरील या नागरिकांची तपासणी केली जाईल. त्यानंतर पात्र झालेल्यांना तीन हजार रुपये दिले जातील. अंदाजे ४८० कोटी रुपये खर्चून ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत असणाऱ्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकारण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे, मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनोसोपचार केंद्र व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.