लांबणीवर पडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने काढले आहेत.
शासनाच्या आदेशानुसार यापूर्वी ३० सप्टेंबरपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता या निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या बरोबरीनेच राज्यातील 29 हजार 443 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचाही रणधुमाळी पाहण्यास मिळणार आहे.सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार राज्यस्तरावर निवडणुका सुरू होण्यामध्ये अ वर्गातील 42, ब वर्गातील 1716, क वर्गातील 12250 आणि ड वर्गातील 15435 मिळून 29 हजार 443 सहकारी संस्थांचा निवडणुकीमध्ये समावेश आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ज्या सहकारी संस्थेच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. त्या सहकारी संस्था वगळून शासनाच्या आदेशानुसार इतर सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आलेल्या होती. त्या टप्प्यापासून 1 ऑक्टोबर 2024 पासून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.