महाराष्ट्र सरकारनं देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये महाराष्ट्रातील देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती हा प्रस्ताव मान्य करून यासंदर्भातला शासन आदेश अर्थात जीआर जारी करण्यात आला आहे. ‘देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टिकदृष्ट्या अधिक मूल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पूर्णअन्न आहे. देशी गायींच्या दुधाचे मानवी आहाराती स्थान, आयुर्वेद चिकित्सा पद्धतीत पंचगव्याचा वाप तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्त्व विचारात घेता देशी गायींच्या संख्येत होणारी घट चिंताजनक बाब ठरत आहे. त्यामुळे देशी गायींचं पालनपोषण करण्यास पशुपालकांना प्रेरित करण्याच्या दृष्टीने त्यांना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्यास मान्यता देण्यात येत आहे’, असं यात म्हटलं आहे.