विधान परिषदेतील चार सदस्यांच्या निरोपाच्या कार्यक्रमावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी भाजपा आमदार सुरेश धस यांच्याबद्दलचा एक गंमतीदार किस्सा सांगितला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अजित पवार म्हणाले, “मी सुरेश धस यांना इतरांपेक्षा जास्त ओळखतो, ही गोष्ट ते देखील मान्य करतील. एकदा मी देवगिरी बंगल्यावर असताना (संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि सुरेश धस राज्यमंत्री होते तेव्हा…) सुरेश धस माझ्याकडे आले आणि त्यांनी थेट त्यांच्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढला होता.” पवार म्हणाले, “मी देवगिरी बंगल्यावर असताना सुरेश धस त्यांच्या आईला आणि इतर काही लोकांना घेऊन माझ्याकडे आले आणि त्यांनी मला एक परवानगी मागितली. मी विचारलं, मला कसली परवानगी मागताय? तर ते म्हणाले, आईलाही बरोबर घेऊन आलोय. त्यानंतर त्यांनी कसली परवानगी मागितली असेल…? त्यांनी थेट दुसरं लग्न करण्याची परवानगी मागितली. मी ते ऐकून कपाळावर हात मारला. त्यांनी त्यांच्या आईला बाजूलाच बसवलंय आणि म्हणतात… आईची पण सहमती आहे, आता तुम्ही परवानगी द्या. त्यावर, मी त्यांना म्हटलं, अहो सुरेशराव काय चाललंय काय?” हा किस्सा सांगून अजित पवार म्हणाले, “कधी कोणाच्या मनात काय येईल हे सांगता येत नाही,”