पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी संचमान्यतेनुसार पदनिश्चिती करण्याचे निर्देश दिले आहेत. परिणामी राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग खुला झाला आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती तात्पुरती स्थगित केली होती. त्यानंतर आता भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सूर्यवंशी यांनी याबाबतचे निर्देश परिपत्रकाद्वारे दिले. ३० सप्टेंबर २०२३ रोजी नोंद असलेली आधार प्रमाणित विद्यार्थिसंख्या विचारात घेऊन २८ जानेवारी २०१९ च्या सुधारित आकृतिबंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मर्यादेत, जिल्हानिहाय लागू होणाऱ्या पदांची पडताळणी करून २०२३-२४ च्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संचमान्यता शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आली आहे.