आता राज्यातील महायुती सरकार एका पत्रामुळे अडचणीत आलं आहे. त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे गृहमंत्रिपद आहे. ठाकरे सरकारला वसुली सरकार म्हणणाऱ्या फडणवीस यांचा सहभाग असलेल्या सरकारवर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वसुली सरकार असा आरोप केला आहे.
महाराष्ट्र स्टेट कॉन्ट्रक्टर्स असोसिएशन (एमएससीए) आणि स्टेट इंजिनीअर्स असोसिएशन (एसईए) यांनी ३ फेब्रुवारीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं. या पत्रातून राज्यातील कायदा, सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सार्वजनिक प्रकल्पांवर काम करणाऱ्या कंत्राटदार आणि अभियंत्यांना स्थानिक राजकीय गुंडांकडून धमक्या दिल्या जातात. खंडणीसाठी कॉल केले जातात. गुंडगिरी केली जाते, असे आरोप पत्रात करण्यात आले आहेत. राजकीय गुंडांपासून संरक्षण देण्याची मागणी कंत्राटदारांनी केली आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सारखीच परिस्थिती आहे. राजकीय पक्षांमधील एकमेकांचे विरोधक आणि स्थानिक पातळीवरील नेते प्रकल्पांची कामं बंद पडतात. त्यासाठी बळाचा वापर केला जातो. कंत्राटदारांकडून खंडणी उकळली जाते. राजकीय गुंडांना आवरणं सरकारी अधिकाऱ्यांना शक्य होत नाही. कंत्राटदारांनी विरोध केल्यास त्यांना मारहाण केली जाते. अशा घटना वाढल्या आहेत. या गटांचा एक ठराविक पॅटर्न आहे. कंत्राटदारांविरोधात तक्रारी दाखल करायच्या आणि मग त्याच्याकडून वसुली करायची, अशा पद्धतीनं त्यांचं काम चालतं, असा उल्लेख पत्रात आहे.
राज्य सरकारचं नामकरण वसुली सरकार करायला हवं, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ‘कंत्राटदार पत्र लिहून खंडणीच्या तक्रारी करत आहेत. गुंडांपासून संरक्षण देण्याची मागणी करत आहेत. राज्यात असा प्रकार पहिल्यांदा घडत आहे. सत्ताधारी पक्षातील गुंड सरकारनंच मंजूर केलेले प्रकल्प रोखत आहेत. या गुंडांकडून मारहाणीचे प्रकार घडत आहेत,’ असं वडेट्टीवार म्हणाले.