फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षातील वरिष्ठ नेते व माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर हाती तुतारी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या. त्यातच आता रामराजे निंबाळकर यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे फलटणच्या राजकारणात उलथापालक सुरू झाली आहे. रामराजे नाईक निंबाळकरांनी अप्रत्यक्षपणे पक्षाचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनेकदा माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर व भाजपा नेते जयकुमार गोरे यांच्याविरोधातील नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी या दोन्ही नेत्यांची पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार देखील केली आहे. “वरिष्ठांनी या तक्रारीची दखल न घेतल्यास पुढील काळात हाती तुतारी घेऊ”, असं रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे.