आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. लवकरच यासंदर्भात शासकीय आदेश काढला जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तयारीही सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवारांच्या अर्थसंकल्पाताली अन्नपूर्णा योजनेच्या घोषणेनंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून एक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला होता. त्यामध्ये लाडक्या बहिणींना वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याविषयी भाष्य करण्यात आले होते. उज्ज्वला योजनेतील महिलांना केंद्र सरकार एका गॅस सिलेंडरमागे 300 रुपये अनुदान देते, एका गॅस सिलेंडरची बाजारातील सरासरी किंमत 830 रुपये धरुन प्रत्येक लाभार्थ्याला प्रति सिलेंडर 530 रुपये याप्रमाणे तीन सिलेंडर मोफत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला फायदा होऊ शकतो. मात्र, त्यामुळे सरकारी तिजोरीवर आणखी भार पडू शकतो.