बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन (#बीएएमएस ) पदवीधारक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. अन्य राज्यातून आयुर्वेद पदवीधारक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रम कोट्यातून आता संधी मिळणार आहे.
महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत नव्हता.
वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना आयुर्वेद विद्यार्थ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी लगेच सादर करण्याचे निर्देश दिले.
राज्याच्या ८५% कोटा (शासकीय व खाजगी अनुदानित) तसेच ७०%कोटा (खाजगी विना अनुदानित) या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.