धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर समाजाच्या शिष्टमंडळात ही बैठक झाली. या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी समिती नेमणार असल्याची माहिती मंत्री शुभराज देसाई यांनी दिली आहे.
कायद्याच्या चौकटीत बसवून कशा पद्धतीने आरक्षण देता येईल, असं आश्वासन या बैठकीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिलं आहे. या कामाबाबत तातडीने एक नवीन समिती गठीत करण्यात येईल, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत
धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत सुरू असलेली बैठक संपल्यानंतर मंत्री शुभराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बैठकीतील चर्चेची माहिती देताना ते म्हणाले की, ”धनगर समाजातर्फे जे उपोषण पंढरपूर येथे सुरु आहे. तिथे आम्ही काल गेलो होतो. आज तातडीने बैठक लावली. आज सुट्टीचा दिवस असतानाही बैठक लावली.”
ते म्हणाले, धनगड जातीचा दाखला काही लोकांनी महाराष्ट्रात मिळवला आहे. ज्या समितीने हे दाखले दिलेत, त्यांची पडताळणी करुन रद्द करण्याचा अधिकार नाही. समितीला तसे आदेश दिलेले आहेत. धनगड आणि धनगर एकच आहेत, हा जो अहवाल आहे, त्यावर काही काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शुभराज देसाई पुढे म्हणाले की, ”धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय झालाय. ज्यात तीन जेष्ठ आयएसएस अधिकारी आणि शिष्टमंडळातील ५ लोक असणार आहेत. या समितीकडून ड्राफ्ट तयार करण्यात येईल आणि त्यानुसार जीआर काढला जाईल. हा जीआर कोर्टात देखील कसा टिकेल, यासाठी प्रयत्न आहेत.”