राज्यातील शेतकरी आणि नागरिक ज्या गोष्टीची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते. ती गोष्ट अखेर घडली आहे. मान्सूनने आता संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी देखील पोषक वातावरण तयार झाले आहे. ही आनंदवार्ता भारतीय हवामान खात्याने दिली आहे. आज सोमवारपासून पुढील आठवडाभर राज्यात मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी बरसतील, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.
यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी महाबळेश्वर, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी अशा पर्यटनस्थळी जाणे टाळावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाला होता. सुरुवातीच्या आठवड्यात दमदार बॅटिंग केल्यानंतर मान्सूनची चाल अचानक संथ झाली. परिणामी अनेक भागात पावसाची तूट राहिली. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. काही ठिकाणी पेरण्या देखील खोळंबल्याचं दिसून आलं.
आजपासून मुंबई, पुणे, ठाणे कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयएमडीने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा-विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.